दुर्गराज राजगड ट्रेक एक अद्भुत अनुभव (१३ ऑक्टोबर २०२४):

काल रविवारी आमच्या ९ जणांच्या ग्रुप ने पाली दरवाजाद्वारे राजगड किल्ल्यावर एक अद्भुत ट्रेक पूर्ण केला. तशी राजगडावर जायची माझी पाचवी वेळ याआधी गुंजवण्यातून ट्रेक केलेले, पाली दरवाजाने जाण्याची ही पहिलीच वेळ. या ट्रेकने निसर्गाच्या सौंदर्य तर अनुभवलेच परंतु राजगडाच्या पायऱ्यांसोबतच इतिहासाच्या पायऱ्यामध्येही आमचा प्रवास झाला. सह्याद्री पर्वतरांगातील राजगडचे स्थान, त्यांची अद्भुत रूपे आणि महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्थळे यांचा अनुभव घेण्याची संधी आम्हाला मिळाली. आणि महाराजांनी आपल्या राजधानी साठी राजगडच का निवडला याचिदेखील प्रचिती येते.

सह्याद्री पर्वत, ज्याला पश्चिम घाट म्हणूनही ओळखले जाते, भारताच्या निसर्ग सौंदर्यात एक अनमोल रत्न आहे. यामध्ये असलेले किल्ले, गड आणि ऐतिहासिक ठिकाणे मराठा साम्राज्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. स्वराज्याची पाहिली राजधानी राजगड किल्ला, विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांनी २६ वर्षे या गडावरून कारभार पहिला. राजगड म्हणजे मराठा साम्राज्याच्या गुढतेचे प्रतीक आहे.

सकाळी ५ वाजता हडपसर, पुणे येथून निघाल्यानंतर सासवड ला नेहमीच्या ठिकाणी चहा नाश्ता करून आम्ही पाली येथे राजगडाच्या पायथ्याशी पोहोचलो. नसरापूर पार केल्यानंतर आमचे धुक्यात हरवलेले रस्ते आणि दोन्ही बाजूला असलेल्या निसर्गाच्या गोड रानफुलांनी स्वागत केले. 

 साधारणतः 9 वाजता ट्रेक चालू केला, सुरवातच घनदाट जंगलातून होते. पुढे पाली दरवाजा हा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे. येथे पोहोचल्यावर आम्हाला किल्ल्याची भव्यता आणि निसर्गाचे सौंदर्य पाहायला मिळाले. दरवाज्याच्या आसपासच्या परिसरात असलेले घनदाट जंगले, गडकिल्ले आणि सह्याद्रीचे रौद्र रूप हे आपल्याला युद्धकलेचे, शौर्याचे आणि संघर्षाचे स्मरण करून देतात. याठिकाणी एक ग्रुप धावत वापस येताना दिसला आणि त्यांच्या मागे मधमाशा होत्या आम्ही लगेच बाजूला झालो आणि थोडे थांबून मधमाशांचे एक्झॅक्ट लोकेशन जाणून घेऊन पुढे जाण्याचा निर्णय घेतला. 

या गोष्टीचा आणि इतिहासाचा विचार करत सदरेपाशी कधी पोहचलो  ते कळलेच नाही. सदर हा किल्ल्याच्या वायव्य भागात स्थित आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्याचे व्यवस्थापन याठिकाणाहून केले. सदरच्या भव्य शिल्पकला आणि त्याच्या आर्किटेक्चरमध्ये इतिहासाची कहाणी आहे. येथे थांबल्यावर आम्हाला किल्ल्याच्या गूढतेचा अनुभव आला.

पद्मावती माची ही किल्ल्याच्या प्रमुख माच्यांपैकी एक आहे. येथे पद्मावती मातेचे ऐतिहासिक मंदिर आहे. आणि समोरच राणी सईबाई ची सुस्थितीत असलेली समाधी या ठिकाणी ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे कार्य झाले असावे. पद्मावती माचीवरून आसपासच्या सिंहगडसोबतच पुरंदर व इतर गडकिल्यांचे विहंगम दृश्य दिसते, जे मनाला शांती देते. पुढे नेढ्या कडे निघालो.

नेढे, राजगड किल्ल्यावरचा एक महत्त्वाचा भाग आहे, ज्याला किल्ल्याच्या तटबंदीवरून प्रवेश करता येतो. हे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दुर्ग सुरक्षा साधनांच्या रूपात वापरले जात असावे. याठिकाणी थोडी मधमाशांची भीती मनात होतीच कारण नेढ्याच्या खालच्या बाजूस खूप सारे मोठ्या आकाराचे पोळे आहेत. आजही, नेढे भव्य कातळामध्ये गूढतेचा अनुभव देतं, ज्यामुळे ट्रेकर्सच्या मनात आकर्षण जागृत करतं.

पुढे सुवेळा माचीवर पोहोचल्यावर, आम्हाला त्या ठिकाणी इतिहासाचा साक्षात्कार झाला. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्ग संरक्षणाच्या तंत्रज्ञानाचे दर्शन घडते. ही माची गडाच्या आसपासची सुरक्षितता आणि संरक्षणाची गरज दर्शवते.

एव्हना प्रचंड ऊन वाढले होते आणि तितकीच भूक देखील लागली होती परंतु माकडांचा विचार करता इतर कुठेही न बसता आम्ही पद्मावती मंदिर गाठले आणि पेटपूजा संपन्न केली आणि संजीवनी माची कडे निघालो.

संजिवनी माचीची रौद्रता आणि इतिहासामुळे आमच्या ट्रेकचा हा अंतिम टप्पा विशेष ठरला. समोरच भव्य तोरणा पाहून डोळे तृप्त होतात. या माचीवरून तोरणासोबतच लांबवर दुर्गदुर्गेश्वर रायगड देखील दिसतो. येथे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास मनात प्रेरणा निर्माण करतो.

या ट्रेकदरम्यान, आम्ही कारवीच्या जंगली फुलांचा देखील अनुभव घेतला. हे फूल सात वर्षांत एकदाच फुलते, आणि त्याच्या सुरेख रंगाने आणि सुंदरतेने वातावरण प्रसन्न बनते. हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार आमच्या ट्रेकचा एक महत्त्वाचा भाग ठरला.

आम्ही बालेकिल्ला गाठला नाही, कारण इतर ट्रेकरकडून कळाले की तिथे आणि गुंजवणी दरवाजामध्ये मधमाशांचा हल्ला झालेला होता. मधमाशांच्या आक्रमक हल्ल्यामुळे काही ट्रेकरांना साखरगावातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या फुलांचा सीजन असल्यामुळे मध गोळा करण्यासाठी या माधमाशा जास्त संख्येने फिरत असाव्यात. पूर्ण ट्रेक मध्ये आम्हालाही खूप सार्‍या मधमाश्या दिसल्या. लोकांना आम्ही सांगत होतो की गडबड गोंधळ आणि घोषणा देऊ नका, परंतु लोक ऐकतील तेव्हा खरं. यावेळी ट्रेकर्स कमी आणि पिकनिक वाले कॉलेज गँग जास्त होती जी काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. वारंवार या घटना घडूनही लोकं सुधरतील तर नवलंच. 

सर्व  घटना आठवत दुपारी 3 ला किल्ल्याच्या खाली पाली गावात आलो पुढे चिरमुडी गावात एकविरा हॉटेलमध्ये मनसोक्त जेवण केले आणि परतीचा प्रवास चालू केला.

हा ट्रेक फक्त एक साहसी अनुभव नव्हता, तर सह्याद्रीच्या समृद्ध इतिहासाचा एक भाग होता. प्रत्येक ठिकाणी आम्हाला इतिहासाच्या कहाण्या डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या आणि निसर्गाच्या सौंदर्याने तर मन भारून टाकलेच होते. ट्रेकमध्ये सहभागी सदस्यांची एकजूट आणि साहसाने एक अद्भुत अनुभव निर्माण केला. भविष्यात आणखी असे ट्रेक्स आपण करणारच आहोत, ज्यामुळे आम्ही सह्याद्रीच्या अद्भुतता आणि इतिहासाशी जुळून राहू.









✍️प्रविण जगताप 

९०११०५४१३४

ट्रेक सदस्य:

प्रविण, राहुल, सरस्वती, प्रमोद, किशोर, अश्विन, दौलत, सचिन आणि संदीप 

#rajgadfort @highlight #trendingpost #sahyadri #adventure #pune #trecking

Comments

Popular posts from this blog

मोहनगड आणि कावळा किल्ल्याचा ट्रेक – २०२४ मधील शेवटचा ट्रेक

Trek to Korigad, Lonavala- कोरीगड ट्रेक, लोनावळा