मोहनगड आणि कावळा किल्ल्याचा ट्रेक – २०२४ मधील शेवटचा ट्रेक
मोहनगड आणि कावळा किल्ल्याचा ट्रेक – २०२४ मधील शेवटचा ट्रेक: मागील रविवारी २९ डिसेंबर २०२४, आमचा मोहनगड आणि कावळ्या किल्ल्याचा ट्रेक खरोखर अविस्मरणीय ठरला. हे दोन्ही किल्ले वरंधा घाटात वसलेले असून ट्रेकिंगसाठी अतिशय सोपे आहेत. पुण्यातून सह्याद्री ट्रेकिंग फाउंडेशन मार्फत ४५ ट्रेकर्सचा आमचा ग्रुप पहाटे ४ वाजता निघाला आणि मोहनगडच्या पायथ्याशी असलेल्या दुर्गाडी गावात पोहोचलो. ट्रेकची सुरुवात मस्त नाश्त्याने झाली, ज्यामध्ये हुरडा आणि चटणीचा समावेश होता. खूप दिवसांनी हुरडा खाण्याचा आनंद काही वेगळाच होता. त्यानंतर आमचे ट्रेक लीडर भाऊ यांनी एक ऐतिहासिक व भौगोलिक दृष्टिकोनातून समृद्ध माहितीपूर्ण ब्रिफिंग दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ट्रेकला वेगळ्याच उंचीवर नेण्यात आले. मोहनगड : ब्रिफिंगनंतर आम्ही मोहनगडाकडे कूच केले. किल्ल्यावर फार काही पाहायला नाही, परंतु दुर्गादेवीचे छोटेसे मंदिर आणि काही पाण्याच्या टाक्या पाहायला मिळाल्या. दुर्दैवाने, बाकी सर्व भाग नष्ट झालेला आहे. मात्र, बालेकिल्ल्यावरून दिसणारा सह्याद्रीचा विहंगम नजारा अफलातून होता. रायरेश्वर, मंगळगड आणि इतर गडांचा आणि घाटवाटांचा मनोरम ...